मुरूम (प्रतिनिधी)- येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा साहित्यिक कविवर्य रघुनाथ ज. महामुनी कोंढेजकर लिखित गोमाता काव्यसंग्रहाचे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रात मंगळवारी (ता.8) रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आंबादास बिराजदार, नळदुर्गच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश शेरे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सतिश शेळके, रोटरी क्लब मुरूम सिटी चे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. बिराजदार म्हणाले की, हा काव्यसंग्रह म्हणजे अनुभवाच्या सागरातून उमटलेले अमूल्य मोती आहेत. त्यातील प्रत्येक कविता एक विचार देणारी आहे. वाचकांना या कवितांमधून केवळ सौंदर्याची अनुभूती मिळत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. या कविता केवळ वाचायच्या नाहीत, तर अनुभवल्या पाहिजेत. प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजापूरचे सचिन घाटे यांनी केले. सूत्रसंचालन शिवतेज भोसले तर आभार अमोल कटके यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.