परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील मद्यंपी शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुर्यभान हाके यांनी दिली.
परंडा तालुक्यातजील चिंचपूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी दि. 28 जून रोजी शिक्षक पी. एन. मोहोळकर मद्यपान करून आल्याचे उघड झाले होते. या प्रकारानंतर शालेय समिती, पालक व ग्रामस्थ संतप्त झाल्याने मुख्याध्यापक गवारे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी रिपोर्ट दाखल कला होता. या प्रकरणी केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांनी शाळेत दारू पिऊन आलेल्या शिक्षकाचा अहवालही दाखल केला होता. प्रभारी गट शिक्षणाधिकारी हाके यांनी शिक्षक मोहोळकर यांचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाखल केला. मोहोळकर यांना निलंबित करून कळंब येथील गटशिक्षण कार्यालयात हजर रहावे व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी दि. 2 जुलै रोजी शिक्षणाधिकारी मापारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे पथक परंडा तालुक्यातील दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देवून तपासणी केली.