कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचे वास्तव्य असलेला बेलिचा मठ हे ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेले ठिकाण अखेर तिर्थक्षेत्राच्या दर्जासह विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. शासनाकडून या मठाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून, सध्या 1 कोटी रुपये खर्चून नव्या सभागृहाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा जन्म शके 1442 मध्ये अनोळी नेकनूर (जि. बीड) येथे झाला होता. नंतर ते कुटुंबासह मुळगाव कळंब येथे वास्तव्यास आले. वीरशैव समाजासह सर्व जाती-धर्मांमध्ये त्यांचा सन्मान होता. आद्य वीरशैव कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती असून, त्यांनी कळंब ते शिंगणापूर ही पदयात्रा सुरू केली होती. अभंग, कीर्तन व समाजप्रबोधन कार्यामुळे त्यांचे कार्य आजही स्मरणीय आहे.

त्यांचे वडील शिवलींग स्वामी हे देखील कळंबचेच रहिवासी होते. त्यांच्याच प्रेरणेतून स्थापन झालेल्या शिवलींग स्वामी मठात आजही हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कळंब येथील सराफ लाईन परिसरात असलेल्या या ठिकाणी गेली 20 वर्षे समाजसेवक राजेंद्रआबा मुंडे व वीरशैव बांधवांच्या पुढाकाराने शिवनाम सप्ताह साजरा केला जातो.

या ठिकाणी लहान मंदिर, निवारा शेड यांसारख्या सुविधा लोकसहभागातून उभारण्यात आल्या आहेत. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे विकासाची कामे रखडली होती. अखेर पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सागर मुंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगरसेवक निलेश होनराव यांनी पाठपुरावा केल्यानंतर तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यात यश आले.


कळंब शहरातील संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या मठाला तिर्थ क्षेत्र करीता तीन कोटी निधी मिळाला असुन यातील एक कोटी च्या सभागृहाचे काम सुरू आहे. शहरात पहिल्यांदाच तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी एवढा भरीव निधी मिळाला आहे.


शहरातील पुरातन असलेल्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिराचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांची होती. अखेर या मंदिराच्या बांधकामाला मुर्तरुप आले असून लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करण्यात येत असून हे काम सुध्दा अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे भक्ता मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 
Top