धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक भव्य पाऊल उचलण्यात येत असून,‘हरित धाराशिव' या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 15 लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.सन 2025 मध्ये एकूण 50 लाख वृक्षलागवडीचा संकल्प ठेवण्यात आला असून,यासाठी ग्रामपंचायती,नगरपालिका आणि नागरिकांनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी होण्याची आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अभियानाचा उद्देश केवळ वृक्षारोपण करणे नसून,भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक,हरित आणि सशक्त धाराशिव घडवण्याचा संकल्प आहे 'हरित धाराशिव' उपक्रमाचे उद्घाटन दि.19 जुलै 2025 शनिवार रोजी सकाळी 10.30 वाजता धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील राखीव वन येथे महाराष्ट्र परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील,धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर ,विधान परिषद आमदार आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, परंडाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत, कळंब-धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा लोहाऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अभिनेते स्वप्नील जोशी उपस्थित राहणार आहेत.
‘हरित धाराशिव' ही संकल्पना केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता, पर्यावरण संवर्धनाचा दीर्घकालीन सामाजिक संदेश देणारा ठरावा, यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्नशील आहे.या उपक्रमातून जागतिक स्तरावर वृक्षलागवडीचा विक्रम करण्याचा मानस असून, धाराशिव जिल्ह्याची एक वेगळी हरित ओळख निर्माण करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.