तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी मंदिर येथे श्री क्षेत्र तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत मंदिराचे नूतनीकरणाचे काम करतांना मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे. असे काम करा यासह अन्य विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघ, समविचारी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि श्री तुळजाभवानी देवी मंदिर समितीकडे देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्वीकारले.
या वेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज, सोमवार गिरी मठाचे महंत इच्छागिरी महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, अमरराजे कदम, किशोर गंगणे, अनंत कोंडो, राजन बुणगे, शिवाजी बोधले, संजय सोनवणे, विनोद रसाळ, सर्वोत्तम जेवळीकर,अमोल कुतवळ, शाम पवार, बाळासाहेब शामराज, परीक्षीत साळुंखे, संजय मैंदंर्गे, श्रीराम अपसिंगकर, सुदर्शन वाघमारे, नागेश शास्त्री अंबुलगे, तानाजी कदम, महेश चोपदार आदी उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्यावर वर्ष 1993 मध्ये बांधकाम करून त्यावर गोपूर आणि कळस याचे बांधकाम केले. हे बांधकाम करण्याच्या अगोदरच सध्याचे अस्तित्वात असलेले प्राचीन बांधकामाला ते वजन झेपणार का, याचा अभ्यास केलाच नाही असे दिसून येते असे म्हटले आहे.
अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे बांधकाम केले तेव्हा जी पद्धत वापरली होती आणि जो रचनेच्या संदर्भातील अभ्यास केलेला होता तसा अभ्यास श्री तुळजाभवानी मंदिराची रचना करा. मंदिरे ही भक्तांच्या कह्यात असली पाहिजेत आणि त्याचे व्यवस्थापन हे भक्तांच्याच कह्यात हवे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण रहित करावे. अशी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.