काटी (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक अमीन गफूर शेख हे नियत वयोमानानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथील शाळेच्या प्रांगणात त्यांचा यथोचित सन्मान करुन सत्काराने निरोप देण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनींना वह्यांचे वाटप केले.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख यांनी सेवाकार्य काळात केलेल्या कामाचे कौतुक करून सेवानिवृत्त शिक्षक हे समाजाचे खरे मार्गदर्शक असतात, दीपस्तंभ समान त्यांची भूमिका असते. सेवानिवृत्ती म्हणजे सेवेला पूर्णविराम नव्हे तर ती सेवापूर्ती समजून पुढील काळात आपल्या अनुभवांची शिदोरी समाजसेवेसाठी देणे आणि अध्यापनाचा आपल्या जीवनातील भाग समजून आपली जबाबदारी सातत्याने पार पाडून आपल्या ज्ञानाचा दीप सातत्याने ठेवत ठेवावा,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, सहशिक्षक तानाजी शेळके, सहशिक्षिका विद्युल्लता आलाट यांनी शेख यांच्या कार्याचे कौतुक करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निरोप घेताना शेख यांनी ग्रामपंचायत, स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी,पालक,ग्रामपंचायत पदाधिकारी,सहकारी शिक्षकवृंद यांनी सेवा कार्यकाळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला होता. यावेळी गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव,केंद्रप्रमुख हणमंत कदम,शिक्षक संघटनेचे नेते लालासाहेब मगर, कल्याण बेताळे,दयानंद जवळगावकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास सोलंकर,उपाध्यक्षा पल्लवी जामगावकर, सर्व सदस्य व केंद्रातील इतर घटक शाळेचे मुख्याध्यापक,नजीब काझी,प्रभारी मुख्याध्यापक तानाजी शेळके,शाळेतील सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.