धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘निर्धार नवपर्वाचा' कार्यकर्ता संवाद मेळावा धाराशिव शहरात उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासंदर्भात विचारमंथन केले. याठिकाणी छावा संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कृषीमंत्री व सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देण्यात आल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचा संपर्क अधिक दृढ करणे, विकासाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवणे आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देणे, यावर चर्चा झाली. या संवाद मेळाव्यात भविष्यातील दिशा, कार्यपद्धती, आणि राजकीय रणनीतीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि नवउमेद निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रा. सुनील मगरे, कल्याणराव आखाडे, गोकुळ शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.