धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव नगर परिषदेत वेगवेगळ्या प्रकारच्या घोटाळे गाजत असताना या नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदाची धुरा अंगावर घेण्यासाठी एकही अधिकारी तयार नव्हता. बदनामीच्या व अनेक अडचणीच्या गर्तेत अडकलेल्या या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे वसुधा फड यांनी निःसंकोचपणे हाती घेतली. ती सूत्रे स्विकारल्यापासून त्यांनी राजकीय व प्रशासकीय अडचणींचा डोंगर पार करीत नगर परिषदेचा कारभार अतिशय सुनियोजित व व्यवस्थितपणे हाकला. या काळामध्ये त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले गेले. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रशासकीय जबाबदारी पार पाडीत नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. एकाही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांची जरी बदली झाली असली तरी एक सक्षम महिला अधिकारी म्हणून त्यांनी वाखाण्याजोगे काम करुन जबाबदारी व यशस्वी कारकीर्द पार पाडण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

धाराशिव नगर परिषदेच्या विविध घोटाळ्यांच्या मालिका समोर आल्याने तत्कालीन मुख्याधिकारी यांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले. त्यातच त्यांना अटक देखील झाली. राजकीय व प्रशासकीय अडचणींचा डोंगर उभा असताना वसुधा फड यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी स्विकारली. पूर्वीच्या राजकीय व प्रशासकीय गुंतागुंतीच्या कारभारामुळे जनतेची सेवा करताना अडचणी आल्या तरी त्या कशा हाताळाव्या याचा हातखंडा असलेल्या फड यांनी नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामांना प्राधान्यक्रम देत कामे पूर्ण करण्यावर भर दिला. यामध्ये सुरळीत पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, शहरांतर्गत स्वच्छता व इतर कामांचा समावेश होतो. ही कामे करताना जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरील राजकारणाचा व त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा प्रत्यय त्यांना वारंवार येत राहिला. त्यामुळे विकास कामे करण्यासाठी निर्णय घेताना त्यांच्या मनावर व निर्णय प्रक्रियेवर प्रचंड राजकीय आणि प्रशासकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी त्या बाबीकडे अतिशय गांभीर्याने आणि शांतपणे दुर्लक्ष करीत विकास कामांना प्राधान्य देत ती कामे तडीस लावण्यावर भर दिला.

या काळामध्ये नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे हित जोपासण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी आणि खबरदारी घेतली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून  विकास कामांमध्ये आपला सहभाग नोंदविला.फड यांच्या कृतीतून कुशल प्रशासक कसा असावा ? याचे मूर्तिमंत उदाहरण शहरवासियांनी प्रत्यक्षात अनुभवलेले आहे. सध्या त्यांची बदली झाली असली तरी पुढील आदेश येईपर्यंत त्या आपले कर्तव्य निभावत राहणार आहेत. त्यांनी राजकीय कुरघोडी, दबाव, प्रशासकीय अडचणींचा डोंगर सहजासहजी परतवून लावीत आपल्या कार्याची चुणूक दाखवली आहे. हा दोन वर्षांचा काळ खरोखरच त्यांच्या कार्यक्षमतेच्या कसोटीचा व अग्नी परीक्षेचा म्हणूनच ओळखला जाईल.


 
Top