धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असून जवळपास 25 कंपन्याच्या माध्यमातून जिल्ह्यात पवनचक्की संच बसवण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु सदरील कंपन्या आपल्या एजंटा मार्फत शेतक ऱ्यां सोबत वेगवेगळ्या प्रकारचे करार करीत आहेत. प्रसंगी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. पर्यायाने जिल्ह्यातील अनेक शेतकरी कंपनीच्या अरेरावीला वैतागले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जर फसवणूक होत असेल तर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहुन त्यांना मदतीची भूमिका ठेवावी असे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी व्यक्त केले आहे.
कोळगे यांनी पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना जगणं मुश्किल झालेले आहे त्यात मुला बाळांचा शैक्षणिक खर्च, दवाखाना, लग्न अशा अनेक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थिती मध्ये पवनचक्क्या कंपन्या कशाही पद्धतीचे करार करून न पाळणे यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत आहे. त्यात पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भिती निर्माण झालेली दिसून येत आहे. निसर्गाच्या अवचक्राला सामोरे जात असताना कंपन्या व प्रशासनाच्या तावडीत सापडलेला शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. या बाबत शेतकऱ्यानी ही आपली फसवणुक झाली असल्यास भारतीय जनता पार्टी किंवा किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या कानावर घालाव्यात. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने कंपनीचे पैसे घेतल्यासारखे शेतकऱ्यांचा सूड घेऊ नये अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा किंवा राज्यपातळीवर नेत्यांच्या समोर विषय उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. असे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तथा माजी सदस्य जिल्हा परिषद धाराशिव रामदास कोळगे यांनी म्हटले आहे.