भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पाथरूड शिवारात पवन चक्कीच्या कंपनीचा स्पॉट आहे. या स्पॉट मध्ये घुसून पवनचक्की कर्मचाऱ्यांना काही गुंडांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना दि. 24 च्या रात्री, दि. 25 जुलै रोजी पहाटे घडली आहे.
अधिक माहिती अशी की तालुक्यातील पाथरूड परिसरात पवन चक्क्याचे काम चालू आहेत. या ठिकाणी गुंडांनी पवनचक्की कंपनीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत नुकसान केले आहे. यामध्ये कंपनीचे कर्मचारी व दलाल यांच्यात हाणामारी झाली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. पवनचक्की कंपनीकडून वसुली किंवा शेतकऱ्यांना जमिनी संदर्भात अडणूक करणे, या व अनेक कारणाने पवन चक्की परिसरात अनेक घटना घडत आहेत. यातच ही घटना आर्थिक देवाण -घेवाणीतून घडल्याची चर्चा सुरू आहे. अमोल लाखे या तरुणाने इतर तरुणांना सोबत घेत पवनचक्की कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. सहा ते सात मोठ्या वाहनांच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. मागील काही काळात वाशी व भूम तालुक्यामध्ये पवन ऊर्जा कंपनीचे सर्रास कामे चालू आहेत. त्या ठिकाणी गुंड येऊन जबरदस्तीने कंपनीचे नुकसान करून धमकावणे शास्त्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत .मात्र कोणत्याही कंपन्यांनी कसल्याही प्रकारची तक्रार वाशी किंवा भूम येथे दाखल केली नाही. अशा घटना वारंवार दोन्ही तालुक्यात घडत आहेत. मात्र महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचे धोरण अवलंबले तरच अशा घटना घडणार नाहीत. अशा नुकसान करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई होणार का ? याकडे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.