कळंब  (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्याविषयी अनेकवेळा वादग्रस्त विधान केलेली आहेत. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, ढेकळांचे पंचनामे करायचे का ? शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करून भिकारीही एक रुपया घेत नाही असे विधान केले. अशा प्रकारची अनेक शेतकरी विरोधी वक्तव्य केली आहेत ज्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज देऊनही कोकाटे यांच्यात फरक पडला नाही. 

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी संकटात असताना कोकाटे यांचे वागणे चुकीचे होते, त्यांचे वर्तन कृषीमंत्री या पदाला शोभणारे नाही. कृषीमंत्री हे पद संवैधानिक पद आहे ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या  आर्थिक स्वातंत्र्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे हे कृषिमंत्र्याचे काम असते. कृषीमंत्री कोकाटे यांना अध्यापही कृषीमंत्री पदाची कर्तव्य व जबाबदारी समजण्यात अपयश आलेले आहे. कृषीमंत्र्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाही परंतु ऑनलाइन जंगली रमी खेळण्याचा खेळ मात्र जमतो अशा निष्क्रिय कृषीमंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. 

शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अपयशी ठरलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची तात्काळ कृषीमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी यामागणीसाठी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी तहसीलच्या पायऱ्यावर बसून प्रतिकात्मक आंदोलन म्हणून पत्त्यांचा डाव मांडून धरणे आंदोलन केले. यावेळी विठ्ठल यादव, वासुदेव पांचगे, दिपक वाघमोडे, आशिष चौधरी, आर्यन लोहार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

 
Top