धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पहिले मरणोत्तर देहदान दि. 22 जुलै रोजी घडून आले. शहरातील मंगल बाबुराव मुंडे यांचा देह महाविद्यालयाला सुपूर्द केला. ही प्रक्रिया जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून करण्यात आली. 

धाराशिव येथे गत चार वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे देहदान कोणीही केले नव्हते. अन्य जिल्ह्यातील 9 देह येथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणण्यात आले होते. परंतु जिल्ह्यातील व्यक्तीने पहिल्यांदाच मरणोत्तर देह देण्याची घटना मंगळवारी घडली. धाराशिव येथे वास्तव्यास असलेल्या मंगल बाबुराव मुंडे (70) यांचा शहरातील खासगी रूग्णालयात कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच त्यांची मुलगी दीपा कल्याण जाधव यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली. जाधव या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सक्रिय साधक आहेत. यामुळे त्यांना यासाठी त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली. काही नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर त्यांना सर्व बाबी समजावून सांगितल्यानंतर देहदानाचा निर्णय झाला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण व न्यायवैद्यक विभागाच्या डॉ. स्वाती पांढरे यांच्या उपस्थितीत देहदानाची प्रक्रिया झाली. 


देहदानाची जिल्ह्यातील पहिलीच घटना

देहदानाची धाराशिव जिल्ह्यातील पहिलीच घटना घडली आहे. हा निर्णय घेणाऱ्या कुटुंबियांचे आम्हाला खूप कौतुक आहे. ही एक सुरुवात आहे, यापुढे लोक पुढे येऊन देहदानाचे आणि अवयवदानाचे निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. धाराशिव जिल्ह्यात देहदान आणि अवयवदानाच्या बाबतीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रयत्न करत आहे.

डॉ. शैलेंद्र चौहान,

वैद्यकीय अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

 
Top