धाराशिव (प्रतिनिधी)- आषाढी वारी 2025 दरम्यान ‘भक्ती विठोबाची,सेवा आरोग्याची' या विशेष उपक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने देहू-आळंदी ते पंढरपूर आणि अन्य जिल्ह्यांतून आलेल्या 9,23,509 वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत 1,114 जणांना तातडीची आरोग्य मदत मिळाली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी 4,376 आरोग्य कर्मचारी कार्यरत होते. पालखी मार्गावर दर 5 किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना',फिरती दुचाकी आरोग्यदूत,आणि 102 व 108 क्रमांकाच्या 331 रुग्णवाहिका सतत सेवा देत होत्या.प्रत्येक मुक्कामी हिरकणी कक्ष,महिलांसाठी 15 स्त्रीरोग तज्ज्ञ,5 चित्ररथांद्वारे जनजागृती,आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम, तसेच पाण्याचे टेस्ट, धुरफवारणी,शुद्ध पाण्याचा पुरवठा अशा विविध सुविधा पुरविण्यात आल्या.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 3,56,389 लाभार्थी, श्री संत तुकाराम महाराज पालखी 2,29,183 लाभार्थी, श्री संत सोपानकाका महाराज पालखी 19,364 लाभार्थी,इतर मानाच्या पालख्या 85,386 लाभार्थी, पंढरपूर संस्था/एचबीटी बूथ 62,670,पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा आयसीयू 86,922,तीन रस्ता शिबिरे 83,595 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या उपक्रमाने लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, तत्पर आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करून वारकरी परंपरेच्या सेवेत आरोग्य विभागाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे.