धाराशिव (प्रतिनिधी)- मानधनवाढीसाठी जिल्ह्यातील 108 वरील रूग्णवाहिका चालक संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील 32 चालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
चालकांनी कोरोना काळातील भत्ता द्या, मानधनवाढ मिळालीच पाहिजे, दर महिन्याचे वेतन वेळेवर करा, अशा मागण्या करत घोषणाबाजी केली. राज्यातील 1980 रूग्णवाहिका चालकांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. 30 जून रोजी रात्री 12 वाजेपासून चालकांनी संप पुकारल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यासह राज्यातील 108 आपत्कालीन रूग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या चालकांना अत्यल्प मानधन मिळते. मानधन वाढवण्याची मागणी अनेकदा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे राज्यभरातील सर्व 108 रूग्णवाहिका चालकांनी 1 जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्रातील 108 रूग्णवाहिका चालकांनी प्रलंबित मागण्या व अन्यायकारक कामकाजाच्या अर्टी विरोधात सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत 108 रूग्णवाहिका चलाक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास, पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास चंदनशिवे, किरण देडे, संतोष शेडगे, नंदकुमार ढेपे, जावेद पटेल आदी उपस्थित होते.