भूम (प्रतिनिधी)- अमृत 2 या योजनेत प्रत्येक नळाला मीटर जरी बसणार असले तरी त्याची अंमलबजावणी करायची कि नाही हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासन हे ठरवणार आहेत. भूम शहराला वाढीव लोकसंख्या व शहराचे वाढते विस्तारीकरण लक्षात घेऊन मी स्वतः राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अमृत 2 ही योजना मंजूर करून आणली आहे. मात्र विरोधकांकडून या योजनेला निवडणूक समोर ठेऊन विरोध केला जात आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी केला आहे.
अमृत 2 योजनेची शहराला गरज असल्याने पाणी कृती समिती व नागरिकांच्या वतीने माजी गटनेते संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी मेहंतीशावली दर्गाह, वीर सावरकर चौक,महात्मा गांधी चौक,नागोबा चौक,ओंकार चौक मार्गे गोलाई चौक या दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे, ॲड. पंडित ढगे, रोहन जाधव, नारायण वरवडे, भागवत शिंदे, ॲड. रणजित साळुंके, डॉ रामराव कोकाटे, अमोल भोसले, प्रभाकर हाके, पोपट जाधव, हभप योगेश आसलकर, तोफीक कुरेशी, संजय होळकर, अरुण देशमुख, बालाजी माळी, बाळासाहेब गवळी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी भरपावसातही नागरिकांची मोठी गर्दी होती. भूम शहर कृती समितीच्या वतीने नगरपरिषदचे मुख्याधिकारी शैला डाके यांना निवेदन देण्यात आले.