नळदुर्ग (प्रतिनिधी)- 25 लाख रुपये हडपण्याच्या हेतूने बँक मॅनेजरने रचलेला बनाव पोलिसी खाक्या दाखवताच 24 तासाच्या आत उघडकीस आला असून या प्रकरणी बँक मॅनेजर वर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी केवळ 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे, त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दिनांक 30 जून रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास नळदुर्ग सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ईटकळ च्या पुढे गेल्यावर मोटरसायकल वरून आलेल्या दोन आज्ञातानी डोळ्यात मिरची पूड टाकून जवळचे 25 लाख रुपये मारहाण करून लंपास केल्याची घटना घडली असल्याची फिर्याद नळदुर्ग येथील एका बँक मॅनेजरने पोलीस ठाण्यात दिली होती, दरम्यान या घटनेचा अंदाज बांधून पोलिसांनी संबंधित फिर्यादी बँक मॅनेजर याच्यावरच संशय घेत त्यास पोलिसी खाक्या दाखवतात हा बनाव रचल्याचा डाव उघडकीस आला असून संबंधित बँक मॅनेजरने हा बनाव रचल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. बँक मॅनेजर कैलास घाटे हा आपल्या बँकेतील पंचवीस लाख रुपये रोख रक्कम सोमवारी दिनांक 30 जून रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर येथील मुख्य शाखेत भरण्यासाठी घेऊन निघाला होता, दरम्यान ईटकळ ओलांडून गेल्यानंतर पाठीमागून एका लाल मोटरसायकल वरून आलेल्या दोघा अज्ञातानी डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करून जवळची 25 लाख रुपये रोख रक्कम लंपास केली असल्याचे मॅनेजरने पोलिसांना सांगितले होते, मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात बँक मॅनेजरनेच हा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणाचा गुन्हा संबंधित बँक मॅनेजर वर दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे अधिक तपास करीत असून यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास केवळ 24 तासाच्या आत लावला असल्याने याबाबत सर्वत्र पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान नळदुर्गच्या बँकेपासून ते इटकळ च्या पुढे घटना घडल्याचे ठिकाण यातील अंतर केवळ 20 किलो मीटर इतके असून 5 वाजता पैसे घेऊन निघाल्या नंतर मोटारसायकलने जाण्यासाठी पावणे दोन तासाचा वेळ लागल्याने आणि बँक मॅनेजरच्या शारीरिक हालचालींवर व बोलण्यावर पोलिसांनी बारीक लक्ष देऊन बँक मॅनेजरचे बोलणेच संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे बँक मॅनेजरकडे वळवली, आणि यातूनच बँक मॅनेजरने 25 लाख रुपये हडपण्याच्या हेतूने रचलेला बनाव उघडकीस आला.