धाराशिव (प्रतिनिधी)- लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नळदुर्गच्या शाखा व्यवस्थापक ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जबाजारी झाल्यामुळेच 25 लाख रूपयांच्या लुटीचा बनाव केल्याचे समोर आले आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी बँक मॅनेजर कैलास घाटे याला गुरूवार दि. 3 जुलै रोजी तुळजापूर न्यायालयात उभे केले असता 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक खोखर यांनी सांगितले की, शाखा व्यवस्थापक कैलास घाटे याची नळदुर्गच्या सार्वजनिक रूग्णालयात भेट घेवून त्याच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळवण्यात आली. घटनेची अत्यंत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून गुन्हा त्यानेच केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्या अनुषंगाने त्यास पैशाची काय आवश्यकता होती. याबाबत गोपनीय माहिती काढली. घाटेवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. युवकास विचारपूस केली असता सुरूवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यानेच लुटीचा बनाव स्वतः रचल्याचे समोर आले. त्याने बुधवारी दुपारी सोमनाथ बाबुराव मनशेट्टी (रा. नळदुर्ग) यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीत लपवलेल्या 25 लाख रूपयांच्या नोटा पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे विनोद इज्जपवार, सचिन यादव, आनंद कांगणे, सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे आदी उपस्थित होते.
सहन केले जाणार नाही
यावेळी पत्रकारांनी जिल्ह्यात लाचखोरीबाबत पोलिस विभागाचे दोन आठवड्यात दोन प्रकरणे उघडकीस आले. याबद्दल पोलिस अधिक्षक यांना विचारले असता खोखर यांनी धाराशिव पोलिस दलात लाचलुचपत बाबत झालेले प्रकार सहन केले नाहीत. लाचखोरांची गंभीर दखल घेतली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.