भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी गेल्या आठ दिवसापासून आपल्या मागण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले होते. हे उपोषण सोडताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनचक्की अधिकाऱ्यासमोर दिलेला शब्दालाही आज पवनचक्की धारक कंपन्याकडून धोका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाने प्रत्येक टॉवरला संरक्षण दिले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर असे गेल्या आठ दिवसापासून वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील 17 शेतकरी तहसील कार्यालय वाशी समोर आमरण उपोषणास बसले होते. काल उपोषण सोडताना खासदार निंबाळकर यांच्या समक्ष दोन्हीही पवनचक्कीचे अधिकारी व तहसीलदार यांच्यासमोर गुरूवार दि. 3 जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत संबंधित शेतकऱ्याचे सर्व मागणी मान्य करून त्या पूर्ण करण्याचे ठरलेले होते. परंतु चार वाजेपर्यंत दोन्ही पवनचक्क्या कंपन्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याने याबाबत संबंधित शेतकऱ्यांना साधाही फोन केला नाही. यामुळे या उपोषणात मध्यस्थी केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही सदर कंपन्याकडून अवमान करण्यात आल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आज शेतकरी संबंधित कंपन्याचे टावर पाडून तारा तोडतील. या भीतीने तालुक्यातील प्रत्येक टावर खाली पोलिसांची ग्रस्त वाढवण्यात आल्याचे दिसून आले. एकंदरीत प्रशासनाकडून शेतकऱ्याच्या पाठीमागे राहण्याचे सोडून संबंधित पवनचक्क्या कंपन्यांना पाठबळ देण्याचे यावरून दिसून येते आहे.