धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांकडून लाखो रूपयांचे सोयाबीन खरेदी करून त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणाविरूध्दं धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ओह. या घटनेत एकूण 23 शेतकऱ्यांना तब्बल 61 लाख 93 हजार 88 रूपयांना गंडा घालण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विलास जाधव (रा. बावी, ता. जि. धाराशिव) आणि प्रमोद अशोक माने (रा. सावरगाव, ता. तुळजापू) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रविंद्र रंगनाथ उंडे (वय 59, रा. बावी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार ही घटना 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बावी येथे घडली. आरोपी प्रशांत जाधव आणि प्रमोद माने यांनी फिर्यादी रविंद्र उंडे व इतर 22 शेतकऱ्यांकडून एकूण 61, 93,088 रूपये किंमतीचे सोयाबीन खरेदी केले होते. मात्र माल खरेदी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना ठरलेली रक्कम दिली नाही. वारंवार पैशाची मागणी करूनही आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर रविंद्र उंडे यांनी गुरूवारी 10 जुलै 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविंद्र उंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रशांत जाधव आणि प्रमोद माने यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 406 आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.