धाराशिव (प्रतिनिधी)- इयत्ता 11 वी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता पारदर्शक होऊन  विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबणार आहे.  याबाबत धाराशिव जिल्ह्यातील 115 कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी आदेशित केले आहे. युवा सेनेचे (ठाकरे) तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला मोठे यश आले असून विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी 115 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करताना उच्च माध्यमिक विद्यालयाची फी कमी दाखवते तर प्रवेश घेताना जास्त फी आकारली जाते. एक प्रकारे चुकीची माहिती देवून त्यांना प्रवेशाचे आमिष दाखविण्याचे काम कनिष्ठ महाविद्यालायाकडून होत आहे. ही विद्यार्थ्यांची सरळसरळ आर्थिक लूट असल्याचे युवा सेनेचे (ठाकरे) तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. ही लूट तात्काळ थांबविण्यात यावी व पोर्टलवर दिलेल्या माहिती प्रमाणे फी घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

या मागणीची माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी तातडीने दखल घेऊन इयत्ता 11 वी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शासन नियमानुसार फी आकारावी व ऑनलाईन भरलेल्या माहितीमध्ये  विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालय लातूर विभाग लातूर या कार्यालयास पत्रव्यवहार करून तात्काळ आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. प्रवेश प्रक्रीयेबाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घावी. प्रवेश प्रक्रियेबाबत गैर प्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घावी असे जिल्ह्यातील 115 कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांना पत्राद्वारे कळविले आहे. युवा सेनेच्या मागणीला मोठे आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला लगाम बसणार आहे.

 
Top