धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिवसारख्या ग्रामीण भागात यापूर्वी 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कलाकार आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे यशस्वी झाले आहे. कलाकार आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव धाराशिव येथे 101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष तथा नियामक मंडळाचे सदस्य विशाल शिंगाडे यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांच्या कडे केली आहे.

नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी  शनिवार 19 जुलै रोजी मुंबई  येथील नाट्य परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात हे निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही संपूर्ण देशभरात नाट्यकला जोपासण्याचे काम करीत आहे.

मोठमोठ्या शहरांमध्ये परिषदेच्या नाट्यसंमेलनांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. खरा कलाकार आणि प्रेक्षकवर्ग हा ग्रामीण भागात अधिक पटीने आहे. धाराशिवसारख्या ग्रामीण भागात यापूर्वी नाट्य परिषदेच्या शाखेने 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन यशस्वी करून दाखविले आहे. सलग सात दिवस दररोज आठ ते 10 हजार प्रेक्षकांची गर्दी या नाट्यपरिषदेला होती. 

गर्दीमुळे कलाकारांच्या कलेला मिळालेली दाद आणि प्रतिसाद धाराशिव शाखेने दाखवून दिलेला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. अशा कलाकारांच्या कलेला वाव मिळवून देण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव 101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन धाराशिवमध्ये आयोजित करावे, अशी मागणी शिंगाडे यांनी लेखी स्वरूपात परिषदेच्या प्रमुख कार्यवाह यांच्याकडे केली आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top