धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव हरित अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 234 ग्रामपंचायत तर 13 नगर पालिका व तीन नगर पंचायती या ठिकाणी एक पेड माँ के नाम वृक्ष लागवड करीत 15 लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये रेकॉर्ड मिळविले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वनराईचे चांगले नंदनवन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दि.19 जुलै रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील शिंगोली शिवारात वन विभागाच्या पाच हेक्टर क्षेत्रावर एक पेड माँ के नाम, जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव अभियान 15 लक्ष वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री सरनाईक बोलत होते.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, सिने अभिनेते स्वप्नील जोशी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, छत्रपती संभाजी नगरचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाखरा, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी व्ही.के. करे, प्रादेशिक विभागीय वन अधिकारी बी.ए. पोळ आदीसह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी आपण ज्या-ज्यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवू त्यावेळी किती झाडे जीवंत आहेत हे पाहण्यासाठी येथे भेट देणार असल्याचेही सांगितले. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी शेत रस्त्याची मांडलेली सुचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यक्रमात उचलून धरली. यावेळी सिने अभिनेते स्वप्निल जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी केले. तर सूत्रसंचालन शिप्रा मानकर यांनी व उपस्थितांचे आभार वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी व्ही.के. करे यांनी मानले.
पुजार व घोष यांचा दोन मेडल्सने सन्मान
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी 15 लाख वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व जनतेला सोबत घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न केले. त्या प्रयत्नास यश आले असून, या वृक्ष लागवडीने विक्रम केला आहे. याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद झाली आहे. त्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे संजय भोला यांनी प्रमाणपत्र व मिडल्स देवून जिल्हाधिकारी पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांना सन्मानित करण्यात आले.