उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालय, विविध संस्था व संघटनांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन योगासने केली. काही ठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात आली. 

स्वत:साठी व समाजासाठी योग या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत आहे. योगाभ्यासाचा नियमित अंगीकार केल्यामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे योगाचे महत्त्व ओळखून योगाभ्यास जनजागृतीसाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‌‘जागतिक योग दिन' साजरा केला जातो. श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम येथे शनिवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरु युवराज गरड यांचे मार्गदर्शाखाली योगाभ्यास घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री तथा भाजपाचे लातुर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, पंसचे माजी उपसभापती गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, भाजपाचे मुरूम मंडळ अध्यक्ष निरजानंद अंबर, उमरगा मंडळ अध्यक्ष साईराज टाचले, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी पंस सदस्य उल्हास घुरघुरे, सुधीर चव्हाण, सुरेश शेळके, गौस शेख, योगेश राठोड, सुजित शेळके, राजू मुल्ला आदीसह मुरूम शहर व ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top