धाराशिव (प्रतिनिधी)- दहा हजार रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला आता आणखी गती मिळाली आहे. कौडगाव एमआयडीसीत तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून जागा वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक गुंतवणुकदारकांचे अर्ज मागविणे संदर्भात जाहिरात दिली असून, त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे 'मित्र'चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
कौडगाव एमआयडीसीत साकारल्या जाणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी 308 एकर क्षेत्र आरक्षित आहे. आरक्षित असलेल्या या क्षेत्रावरील जागा 95 वर्षांच्या नोंदणीकृत लीज करारावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. टेक्निकल टेक्सटाईलसारख्या उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या आधुनिक आणि पायाभूत सुविधा या पार्कमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 16.54 कोटी रुपयांची पायाभूत सुविधा निर्मितीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, व उद्योग जगतालाही दर्जेदार आणि सुसज्ज जागा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पामागील मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने एमआयडीसीमार्फत राबवण्यात येणारा हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
कौडगाव एमआयडीसीत तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मितीसाठी अभिरुची दाखवण्याची 17 सप्टेंबर अंतिम तारीख असणार आहे. इच्छुक उद्योजकांनी त्यासाठी “उद्योजक साक्षी“ कार्यालय, मारोल, मुंबई येथे रीतसर प्रस्ताव सादर करावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
जगभरातील आघाडीच्या कंपन्यांना आमंत्रण
कौडगाव एमआयडीसी येथील या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमध्ये देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक विशेष राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत असाही कासेई (जपान), ड्यूपाँट (अमेरिका), तेजिन लिमिटेड (जपान), मिलिकेन (अमेरिका), फ्रॉइडेनबर्ग (जर्मनी) यांसारख्या आघाडीच्या 10 कंपन्यांसह 24 अन्य कंपन्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कंपन्यांसमोर एमआयडीसीकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.