तुळजापूर (प्रतिनिधी)- माढा तालुक्यातील मैसगाव (जि. सोलापूर) येथून आपल्या आई-वडीलांसोबत श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीच्या देवींच्या दर्शनासाठी आलेला स्वराज गोपाळ सातव (वय 7 वर्षे) हा चिमुकला मुलगा आज दर्शनाच्या गर्दीत अचानक हरवला होता. पालकांनी सैरभैर होऊन मंदिर परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नव्हता.
दरम्यान, कलोळतीर्थ परिसरात फिरताना हा मुलगा एकटाच रडत असल्याचे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ स्वच्छता विभागाचे कर्मचारी ऋषिकेश पवार, सोमनाथ चव्हाण, रुपेश बेले व प्रवीण कोळगे यांनी या बाबतची माहिती प्रशासकीय कार्यालयात दिली.
या घटनेची दखल घेत स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे व सहायक स्वच्छता निरीक्षक अक्षय साळुंखे यांनी तात्काळ पुढील कार्यवाही सुरू केली. प्रशासनाच्या सहकार्याने मुलाची ओळख पटवून त्याचे आई-वडील शोधून काढण्यात आले आणि त्यांना त्यांचा मुलगा सुखरूप सुपूर्द करण्यात आला.