भूम (प्रतिनिधी)- भूम येथे आज आठवडे बाजारानिमित्त भूम बाजारपेठेमध्ये हुबेहुब दिसणारी पाचशे रुपयांची  बनावट नोट वस्तूच्या मोबदल्यात देणारे काही सराईत गुन्हेगार भूम शहरांमध्ये व्यापाऱ्यांना खरेदी करत असताना आढळून आले. येथील वारे क्लोथिंग सेंटर या कपड्याच्या दुकानांमध्ये काही सराईत गुन्हेगारांनी पाचशेची बनावट नोट देऊन कपड्याची खरेदी केली. दुकान मालक यांच्या आईच्या हातून अनवधानाने गडबडीत ही बाब लक्षात आली नाही. काही काळानंतर व्यापारी वारे यांना लक्षात आले की ही पाचशेची नोट बनावट आहे. परंतु तोपर्यंत देणारा सराईत गुन्हेगार मात्र पुढे निघून गेला होता. अशा बनावट नोटा देणाऱ्या सगळ्याच गुन्हेगारापासून सावधान राहण्याचे आवाहन व्यापारी राकेश वारे यांनी केले आहे. भूम शहरातील साई गोळी सेंटरचे मालक अमोल रोकडे व अंकुश किराणा स्टोअर्सचे मालक अंकुश क्षीरसागर यांची देखील अश्याच प्रकारे फसवणूक झाली असल्याचे दिसून आले. एकंदरीतच शहरातील विविध दुकानात या बनावट नोटा गुन्हेगारांनी खपवून पळ काढला आहे. या नोटांची मालिका ही 5AE 404284 अशा प्रकारची आहे. तरी सावधानता बाळगण्याचे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे.

 
Top