वाशी (प्रतिनिधी)- प्रगतशील शेतीच्या दृष्टीने पारंपारिकतेला बगल देत शेतात आधुनिकता आणणे महत्त्वपूर्ण असून यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः तज्ञ होणे आवश्यक आहे. तज्ञ होण्याच्या दृष्टीने शेतकर्यांसाठी शेतीशाळा फायदेशीर ठरत असल्याचे मत तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण गडदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत वाशी तालुक्यातील झिन्नर शिवारात शेती शाळा घेण्यात आली. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक प्रविण गडदे मार्गदर्शन करत होतो. शेती शाळेस सरपंच नितीन हिंगमिरे, प्रभाग समन्वयक अर्चना शेप, कृषी सखी दैवशाला विश्वेकर, स्वाती काळे, ग्रामस्थ महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.
शेती शाळेत उगवणक क्षमता, पेरणीपुर्व, पेरणी व रोपावस्था, शास्त्रीय व फुलोरावस्था, किडीचे नियोजन, येलो वेन मोझॅक उपाययोजना, घरगुती बियाणे राखून ठेवणे, माती परीक्षण, जास्त व खंडीत पावसाच्या वेळी पिकाची घ्यावयाच्या काळजी, दशपर्णी अर्क, बीजामृत, जीवामृत, निंबोळी अर्क तयार करणे, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती गांडूळ खत, लघू अभ्यास किटक नाशकांचा वार्षिक वापर आणि मानवी जीवनावर होणारे परिणामाची माहिती देत मार्गदर्शन केले.