धाराशिव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने आर्थिक वर्ष 2023-24 करिता उत्कृष्ट सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या सहकार पुरस्कारांची घोषणा केली आहे. राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या संस्थांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना सहकार महर्षी (11 संस्था),सहकार भूषण (21 संस्था) आणि सहकार निष्ठ (23 संस्था) अशा तीन गटांत विभागून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानुसार राज्यातील सहकारी संस्थांची 10 गटांत विभागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांना या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था पांडुरंग साठे यांनी केले आहे. संस्थांनी आपले प्रस्ताव 2 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 या कालावधीत संबंधित तालुका सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था कार्यालयात सादर करावेत.
पुरस्कार संदर्भातील सविस्तर माहिती व गटनिहाय मार्गदर्शनासाठी तालुका सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था धाराशिव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांना उत्कृष्ट कार्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून,इतर संस्थांनाही प्रेरणा मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.