परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील दि.28 जुन रोजी चिंचपूर बुद्रुक.येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शाळेतील एक शिक्षक हे नेहमीप्रमाणे आज शाळेत आले. पण या वेळीही ते दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले.
शनिवार दि.28 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी शिक्षक शाळेत पोहोचले. मात्र मद्यपान करून आल्याने ते विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या स्थितीतच नव्हते. ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरित कडक पाऊल उचलत त्यांना शिकवण्यापासून रोखले आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोन करून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा समिती अध्यक्ष दत्ता सुतार, उपाध्यक्ष रविंद्र कुंभार, गावचे सरपंच महेश देवकर, उप सरपंच नितीन सावंत, युवानेते अनिल पाटील, इतर सदस्य आणि काही पालक शाळेत दाखल झाले. प्रत्यक्ष पाहणी केली असता शिक्षक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला.
शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाचे असे वर्तन पाहून पालक व ग्रामस्थ संतप्त झाले. शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखली जाणारी शाळा अशा घटनांमुळे बदनाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.याप्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून संबंधित शिक्षकावर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा असतो,मात्र अशा वर्तनामुळे शाळेची शिस्त धुळीस मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.