धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात ‌‘सॅटेलाईट स्किल सेंटर' करण्याच्या प्रस्तावास पुणे येथील सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाने मान्यता दिली आहे. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी आधुनिक शेती व प्रक्रिया उद्योगासह उद्योगानुकूल प्रशिक्षण, जागतिक दर्जाचे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगाराच्या संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार असल्याची माहिती ‌‘मिञ'चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ स्वाती मुझुमदार, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव,तहसीलदार अरविंद बोळंगे,मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करण्यात आली. 

धाराशिव जिल्ह्यात ‌‘सॅटेलाईट स्किल सेंटर' सुरू करण्याच्या प्रस्तावावर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमांतर्गत उद्योग, विद्यार्थी, स्थानिक लोकसंख्या आणि विविध घटकांसाठी व्यावसायिक आणि कौशल्यात्मक प्रशिक्षण देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील युवकांना उद्योगानुकूल प्रशिक्षण, जागतिक दर्जाचं कौशल्य, शेती व प्रक्रिया उद्योग क्षेत्र तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.


शेतीसाठी ड्रोन आणि एआय वापराचे प्रशिक्षण

कृषी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या महत्वपूर्ण ज्ञानशाखाबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी ड्रोनचा वापर,  एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अचूक मृदा विश्लेषण, पिकांना पाणी व तणांसाठी उपाययोजना ,अन्न प्रक्रिया अशा तंत्रज्ञानांवर आधारित प्रशिक्षणही आता आपल्या जिल्ह्यातच सिंबायोसिस मार्फत दिले जाणार आहे. तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोनातून ड्रोन चालवणे आणि त्याद्वारे फोटोग्राफी व विश्लेषण कार्यपद्धती शिकवण्याचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. 


 
Top