भूम (प्रतिनिधी)- श्री संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दांडेगाव गावात गावकऱ्यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा येथून तालुक्यातील दांडेगाव येथे विसाव्याला थांबते. सायंकाळी पाच वाजता एकनाथ महाराजांची पालखी सोहळा दांडेगाव येथे आगमन झाले. पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फी रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. दांडेगाव येथील ग्रामस्थ दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने भोजन व्यवस्था केली जाते. काही वारकऱ्यांना ग्रामस्थांच्या घरोघरी जेवण व्यवस्था करतात. विसाव्यास असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रात्री कीर्तन, जागर, भजन कार्यक्रम झाले.
त्यानंतर सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करते. सकाळी नागरडोहण येथे पालखीचा मोठा रिंगण सोहळा पार पाडला जातो. पुढे अनाळा मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ होते. दांडेगाव ग्रामस्थांच्यावतीने या पालखी सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेऊन पालखी सोहळ्याची व्यवस्था पार पाडतात. यावेळी पालखी प्रमुख गोसावी महाराज यांनी यावेळी पालखी मार्गामध्ये ज्या ठिकाणी गाव असेल त्या ठिकाणी 7 मीटरचा रस्ता व गाव नसेल त्या ठिकाणी नऊ मीटरचा रस्ता करण्यात येत आहे. परंतु ज्या त्या गावांमधून पालखी जात असताना 7 मीटर रस्ता असल्याने अडचण निर्माण होते. प्रशासनाने गावातील ही रस्ता 9 मीटरचा करावा अशी मागणी केली.