धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व 60 वर्षे वयोमर्यादा पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अत्याधुनिक साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन स्वशक्तीकरण विभागाकडून अधिकृत मंजुरी प्राप्त झाली असून, याचे आयोजन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनिक घोष जिल्हा परीषदचे समाज कल्याण विभागाचे खामीतकर यांच्यासह सर्व पंचायत समितीचे बी.डी.ओ. जिल्हा शैल्य चिकित्सक उपस्थीत होते. यामध्ये जिल्हा प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. बैठकीत ठरविण्यात आले की, 15 जुलैनंतर मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात तपासणी शिबिरे घेतली जातील.
या शिबिरांमध्ये पात्र दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना खालील अत्याधुनिक साहित्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. दिव्यांगांसाठी: ट्रायसायकल, मोटराईज ट्रायसायकल, व्हीलचेअर, कुबडी, स्मार्ट केन, सुगम केन, स्मार्ट फोन, डिजीटल श्रवणयंत्र, जेष्ठ नागरिकांसाठी: बेल्ट (मान, पाठ, गुडघा व पायासाठी), काठ्या, कमोड चेअर, व्हीलचेअर, डोळ्यांचे चष्मे, दातांची कवळी, श्रवणयंत्र इत्यादी.
या लाभासाठी दिव्यांगांनी खालील कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहणे आवश्यक आहे दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला तपासणीसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांची टीम प्रत्येक तालुक्यातील शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.