भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर परिसरात असलेल्या सटवाई देवी ला बकरे कापून मांसाहाराचा नैवैद्य दिला जात होता. यासाठी भाविक हे महादेव मंदिर परिसरात बकरे कापणे व त्याच ठिकाणी ते शिजवणे असा प्रकार करत होते. माणकेश्वर येथील पीपल्स राईट फाउंडेशन चे सचिव समाजसेवक ह.भ.प.गणेश महाराज अंधारे यांनी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करून लेखी पत्रे देऊन देखील प्रशासनाच्या वतीने काहीच ठोस निर्णय घेतला जात नव्हता. माणकेश्वर येथील महादेव मंदिर हे 12 व्या शतकातील हेमाडपंथी शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले व पुरातत्व खात्याने संवर्धन केलेले मंदिर आहे. येथील महादेवाचे मांसाहार करून दर्शन घेणे तसेच परिसरात वावरणारे कुत्रे हे त्याच भागातील टाकलेले मटणाचे तुकडे खाऊन मंदिरात जात होते. यामुळे मंदिराची विटंबना होऊन पावित्र्य धोक्यात आले होते. अखेर गणेश अंधारे हे गेल्या तीन दिवसांपूर्वी उपोषणास बसले व त्यानंतर प्रशासनाला जाग आली. भूम तालुक्याचे तहसीलदार यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकारी, परंडा पोलीस, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गणेश अंधारे यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत दि.11 जून रोजी बैठक घेऊन मंदिर परिसरात बकरे कापणे व मांसाहार शिजवणे यावर तात्काळ बंदी घालून मंदिर परिसरात 2 महिने पोलीस व प्रशासनाचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे गणेश अंधारे यांना कळवले. उपोषण स्थळी  रुक्मिणी रोडगे पुरातत्व सहाय्यक

विभाग छ. संभाजीनगर, डॉ.कामाजी डख पुरातत्व समनव्यक, सहायक पोलीस निरीक्षक परंडा एस.एम.सुर्वे, पोलीस अंमलदार सुशील कोळेकर, ॲड. विलास पवार, गणेश नलावडे, निलेश वीर, सागर गायकवाड, ग्रामसेवक एम.एन. टाळके, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top