परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून हिंगणगाव व पिंपळवाडी या ठिकाणी दिनांक 8 जून व 9 जून रोजी सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये अनेक केळी बागेचे तसेच अनेकांच्या घरावर तर पिंपळवाडी रोड लगत मदर डेअरी गाईच्या शेडवर झाड पडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिंपळवाडी गावचे माजी सरपंच हणमंत गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
पिंपळवाडी येथील शेतकरी विश्वनाथ गजेंद्र काकडे यांच्या केळीचे फार मोठे प्रमाणात नुकसान झाले असून अनेक झाडे बार्शी - परंडा रोडवर कोसळली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच आबाराव अभिमान होरे या दूध व्यवसायिकांच्या डेअरी वरती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निलगिरीचे झाड पडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये गोठ्यात असणाऱ्या गाई जखमी झालेल्या आहेत. तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे तात्काळ पंचनामा होऊन शासकीय मदत मिळावी. अशी शेतकरी वर्गात मागणी होत आहे. याबाबत शासनाकडे मागणी करून पाठपुरावा केला जाईल असे माजी सरपंच हणमंत गायकवाड यांनी सांगितले. वादळ वाऱ्याच्या तडाख्याने होणारा मोठा अनर्थ टळला आहे.