परंडा (प्रतिनिधी)- श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे परंडा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील नाथ चौकात पालखी सोहळ्याचे आगमन झाले. यावेळी पालखीप्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, नगर परिषदचे मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.उद्योजक नितीन भोत्रेकर, दत्तप्रसाद पाटील यांच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किट,चहा यांचे वाटप करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवार पेठेतील मोहन देशमुख यांच्या निवासस्थानी पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. श्री एकनाथ महाराज पालखी सोहळ्यात सुमारे 27 दिंड्या सहभागी झाल्या असून पालखी आज सकाळी मुंगशी मार्गे मार्गस्थ झाली.