कळंब (प्रतिनिधी)- युवा ग्राम अस्सेस टू जास्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्प अंतर्गत कळंब येथे जागतिक बाल कामगार विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये स्थानिक समाजातील विविध प्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत बाल हक्कांची जाणीव वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात कळंब पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक प्रभा कुंडगे यांनी बालकांना व पालकांना बालकामगारांविरोधी कायदे व त्यांचे पालन करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर, त्यांनी बालकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे व पालकांनी मुलांना कामासाठी भागवू नये, असे आवाहन केले. युवा ग्रामचे एच पी देशमुख यांनी बालकामगारांच्या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आदिवासी पारधी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करताना, या समाजातील मुलांच्या कल्याणासाठी केलेल्या कामांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी अंगणवाडी सेविका, आशा ताई व अंगणवाडी मदतनीस यांच्यासह युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत चालत असलेल्या अक्सेस टू जस्टीस प्रकलपाचे प्रमुख संतोष रेपे, राहुल देशमुख, प्रकाश काळे, सुनीता विभुते, संभाजी वळशे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आपला मोलाचा परिश्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये बाल हक्कांची जाणीव वाढविण्यासाठी विविध मार्गदर्शन व चर्चा आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून बालकांचे संरक्षण व त्यांचे हक्क याबाबत जनजागृती करण्यात आली.