धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील पोस्ट ऑफिसजवळील ‘क्लासिक जेंट्स पार्लर' या सलूनमध्ये दाढी उधार न केल्याच्या कारणावरून एका नाभिक व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 9 जून रोजी रात्री 9.30 वाजता घडली असून, हल्ल्यात ऋतुराज बालाजी मोरे (वय 19) हे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी बबलू सूर्यवंशी याने धारदार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मोरे यांच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या धाराशिव जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हल्लेखोरास तात्काळ अटक करण्याची, सलून व्यावसायिकांना पोलिस संरक्षण देण्याची व पोलिसांनी अशा घटनांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिला आहे.
ही घटना शहर पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर घडूनही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांच्या तत्परतेवर तसेच कार्यक्षमतेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने स्वतः पलायन केले की त्याला मदत झाली. यावरून शहरात विविध चर्चा सुरू आहेत. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय राऊत, जिल्हा संघटक किशोर राऊत,जिल्हा सरचिटणीस दाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ पवार,शहराध्यक्ष गणेश वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा स्वाक्षऱ्या आहेत.