धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्यावर मजबूत व दणकट तसेच टिकाऊ हॉट मिक्स डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या अगदी मधोमध विद्युत पोल असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. ते काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या निवेदने व आंदोलने केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ते पोल दि.11 जून रोजी पाठविले आहेत. त्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे या परिसरातील नागरिकांना रस्त्यातील पोलच्या अडथळ्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता ती समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे. 

धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण रस्ता करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 96 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते काम करताना रस्त्याच्या मधोमध 18 विद्युत पोल उभे होते. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. ते काढण्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी विद्युत वितरण कंपनी तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने व आंदोलन करून ही मागणी सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दि.11 जून रोजी ते वाहतुकीस अडथळा ठरत असलेले 18 विद्युत पोल जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले आहेत. त्या रस्त्याच्या बाजूला नवीन 18 पोल आणि 2 डी.पी. बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे साळुंके हे अपघातात जखमी झाल्यामुळे ते रुग्णालयात बेडवर उपचार घेत आहेत. मात्र, समाजसेवेचा वसा जपत त्यांनी दवाखान्यातून या कामाचा फोनद्वारे पाठपुरावा करून शासकीय यंत्रणेला कामाला लावले आहे. ते काम अर्धवट न ठेवता पूर्ण केलेले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कृतीमुळे या भागातील नागरिकांची कायमची अडचण दूर झालेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून साळुंके यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत.

 
Top