तुळजापूर (प्रतिनिधी)- दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेली देवीस हातातील पंख्याने हवा घालण्याची प्रथा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडल्याने दिनांक 9 पासून बंद करण्यात आली आहे. दिनांक 8 रोजी मृग नक्षत्र दिसल्यानंतर 9 तारखेला पाऊस देखील झाला. त्यामुळे देवीस पंखा घालणे बंद करण्यात आले.
अशी आहे देवीला वारा घालण्याची अनोखी प्रथा
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी श्री तुळजाभवानी मातेची ऐतिहासिक अलंकार पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सकाळच्या पूजेनंतर दुपारी 1 ते 4 या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेस पंख्याने हवा घालण्याची प्रथा आहे. देवीचे सेवेकरी पलंगे घराण्याकडे हा मान असून मखमली कापडाच्या पंख्याने देवींजींना वारा घातला जातो. या दुपारच्या कालावधीत देवींजींना चांदीच्या भांड्यामधून सरबत इत्यादी थंडपेये देखील देण्याची प्रथा आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडेपर्यंतच्या कालावधीत ही प्रथा पाळली जाते.