कळंब (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि शाळेचा पहिला दिवस म्हणजे लहान मुलांच्या मनात भीती आणि उत्सुकतेचे संमिश्र भाव असतात. हीच भीती दूर करून मुलांनी आनंदाने शाळेत यावे, यासाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सोमवारी (दि. 16 जून) शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात आणि आपुलकीने स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्या पावलांनी शाळेच्या आवारात प्रवेश करताच, त्यांना रंगीबेरंगी फुगे, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके आणि गुलाबाचे फूल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या अनपेक्षित स्वागतामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळेविषयीची त्यांच्या मनात असलेली भीती क्षणात नाहीशी होऊन त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या स्वागत समारंभानंतर मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक खिचडीसोबत गोड शिऱ्याचे वाटप करण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणीत झाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयीची ओढ निर्माण झाली असून, त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. यावेळी  पालक भागवत वाघमारे, सौ. रेखा वाघमारे, रेश्मा बोराडे,  बापू गायकवाड, भास्कर काळे, मुख्याध्यापक  निकम पोपट, सहशिक्षक प्रदीप यादव, किशोर वाघमारे, सज्जन बर्डे, रमेश अंबिरकर, नामदेव झाडे, आणि सूरज राऊत यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

 
Top