भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपालिका कंत्राटी कामगार असणारे संतोष खारगे यांचा मुलगा प्रतीक पोलीस अंमलदार झाला.
आई घरकाम करून शहरातीलच गुरुदेव दत्त हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करतात. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये धाराशिव जिल्हा पोलीस पदावर लेखी परीक्षेत 97 मार्क घेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. व पोलीस म्हणून धाराशिव येथे रुजू झाला. तद्नंतर प्रशिक्षणासाठी प्रतीकची पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभूळगाव (लातूर) येथे निवड झाली. 9 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर लेखी तसेच मैदानी चाचणीत 1320 पैकी 1070 गुण घेऊन त्याने पोलीस प्रशिक्षण चाचणी पार पाडली. दिनांक 09 जून 2025 रोजी दीक्षांत संचलन पार पडले व प्रतीकने राष्ट्रसेवेची शपथ घेतली. यावेळी आई सारिका वडिल संतोष खारगे, चुलते धनंजय खारगे, भाऊ प्रथमेश, आत्या अनिता बाबर व साधना भुजबळ, मामा रवी शिंदे, आतेभाऊ आशिष बाबर व अनिकेत भुजबळ तसेच आतेआजी नंदा आसलकर उपस्थित होते. प्रतीकने समारंभावेळी शपथ घेतली यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे प्रतीकने अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर चीज केले व प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ही म्हण सार्थ ठरवली. प्रतीकचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आहे.