धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरण कंपनीचा 20 वा वर्धापन दिन धाराशिव शहरातील मंडळ कार्यालय परिसरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त मंडळ कार्यालयाची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवार, 6 जून रोजी महावितरणच्या वर्धापन दिन स्वस्तिक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. जवळपास एक हजार विद्युत अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यकारी अभियंता (प्रशासन) निलांबरी कुलकर्णी, तुळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे, धाराशिव विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे, व्यवस्थापक दिलीप पाटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून व वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त 1 ते 5 जून दरम्यान जिल्ह्यात सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षीसे वितरण करण्यात आली. तसेच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात आला. भोजन व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी व्यवस्थापक दिलीप पाटोळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महावितरण कंपनीचे अधिकारी, अभियंता, कर्मचारी, कंत्राटी कामगारांनी परिश्रम घेतले.