धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेल्या महत्वपूर्ण कामांना राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या आयुर्वेद महाविद्यालयास 39.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या निधीपाठोपाठच आयुर्वेद महाविद्यालयातही आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला असल्याची माहिती 'मित्र'चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नातून धाराशिव शहरात 1986 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची भव्य इमारत उभारली आहे. आजघडीला तेथे एकूण 14 विविध विभाग कार्यरत असून 318 विद्यार्थी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहेत. 65 डॉक्टर याठिकाणी पदव्युत्तर शिक्षण घेत असून आयुर्वेदात 17 विद्यार्थी संशोधन करीत आहेत. 132 खाटांची क्षमता असलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रारंभी केवळ 25 एवढी प्रवेश क्षमता होती. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ही क्षमता आता 60 इतकी झाली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे यांनी रुग्णांना अधिक दिलासा मिळावा यासाठी सुसज्ज शस्त्रक्रियागार आणि विविध वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने आपल्याकडे निधीची मागणी केली होती. या सर्व बाबींचा रीतसर प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून तातडीने प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला असून 39.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
या मिळणार सुविधा
12 कोटी रुपयांची स्किल लॅब उभारली जात आहे. सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष व उपकरणे साकारण्यात येणार आहे. अद्ययावत ऑपरेशन थिएटर शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीकृत निर्जंतुकीकरण विभागही उभारला जाणार आहे. वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेऊन वैद्यकीय गॅस पुरवठा यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयु, नवजात शिशू आयसीयु, आपत्कालीन सेवा व पुनर्वसन विभागासाठी सतत वैद्यकीय गॅसची उपलब्धता राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.