धाराशिव (प्रतिनिधी)- आरोग्य सेवक पदावर नोकरी लावतो म्हणून 8 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात 2 जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राघुचीवाडी येथील दत्तात्रय संपत करवर या सुशिक्षित बेरोजगार तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून अंकुर रावसाहेब देशमुख (रा. नरखेड, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) व मुंबई येथील संजय यमाजी साळवे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 406, 420, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
राज्यभर ही टोळी सक्रीय असल्याची प्राथमिक माहिती असून, धाराशिव, सोलापूर, बीडसह अन्य जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. देशमुख व साळवे या दोघांनी करवर याला विश्वासत घेवून सांगितले की, तु 8 लाख रूपये दे, तुला आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावतो. आजवर आम्ही अनेक लोकांना नोकऱ्या लावल्या आहेमत. तुलाही त्याप्रमाणे नोकरी लावतो. त्या दोघांवर विश्वास ठेवून सुरूवातीला अंकुर देशमुख याच्याकडे 2 लाख रूपये रोख दिले व त्यानंतर 3 लाख रूपये रोख दिले.
संजय साळवे याच्या कोटक बॅक कल्याण वेस्ट, ठाणे, मुंबई या बँकेत खाते क्रमाक 9512645525 यावर दिनांक 12/10/2021 रोजी फिर्यादीची आई सिंधूबाई संपत करवर यांचे प्रभात मल्टीस्टेट बँक शाखा धाराशिव खाते क्रमांक 001806 वरून NEFT चेक क्रमांक 032133 ने 1,50,000 रूपये जमा केले. रोख रक्कम घेवून देशमुख याने साळवेच्या फोन पे वर 7 ऑक्टोबर 21, 16 ऑक्टोबर , 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर 21 व इतर तारखेला वेळोवेळी असे दीड लाख जमा केले. पैसे घेवून अनेक वर्ष झाली तरी नोकरी लावली नाही. वेळोवळी केवळ आश्वासन दिले.