धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय स्टेट बँकेच्या स्थापनेस 70 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्त भारतीय स्टेट बँकेमार्फत देशभरात “सात दशक देश के साथ“ या घोष वाक्यासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. सुरेशबाबू उदयगीरी क्षेत्रीय प्रबंधक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव रिजनमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दिनांक 21 जून 2025 रोजी 6 ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी धाराशिव कीर्ती किरण पुजार व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव मैनाक घोष यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्षेत्रीय प्रबंधक सुरेशबाबू उदयगीरी यांनी केले व बँकेचा इतिहास व बँके मार्फत राबविले जाणारे विविध समाज/देश हिताचे उपक्रम याबद्दल माहिती दिली. धाराशिव रिजनमध्ये धाराशिव,तुळजापूर, ढोकी, भूम,उमरगा तसेच निलंगा येथे एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे नमूद केले.या प्रसंगी महिला स्वयं सहायता गट, सी एम ई जी पी, पी एम ई जी पी, पी एम एफ एम ई व पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी धाराशिव व मा.सी ई ओ जिल्हा परिषद धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच मान्यवरांनी लाभार्थ्यांसोबत संवादही साधला.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महिला स्वयं सहायता गट बँकाच्या कर्जाची परतफेड वेळेत करत असल्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग असल्याने त्यांचे कौतुक केले. यावेळी सीईओ मैनाक घोष यांचेही भाषण झाले. आभार बँकेच्या वतीने सचिन कुलकर्णी यांनी मानले.