धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड येथे दरोडा, जबरी चोरीसारख्या 17 गुन्ह्यांतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 जून रोजी वरूडा पुलानजीक सापळा लावून शिताफीने पकडले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 25 जून रोजी गस्तीवर होते. यावेळी दरोडा, जबरी चोरी सारख्या अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला कुख्यात आरोपी मोतीराम उर्फ कुक्क्या बादल शिंदे (रा. मोहा, ता. कळंब) हा काही कामानिमित्त धाराशिव शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरूडा पुलाजवळ सापळा लावून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पथकाने गुन्हे अभिलेख पाहिला असता आरोपीवर धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यातील अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. आरोपीने वरील गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांना अनेक दिवसापासून गुंगारा दिला होता. परंतु अखेर स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत पुढील कारवाईकरिता ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोहेका शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, नितीन भोसले,रत्नदीप डोंगरे यांचे पथकाने केली आहे.