भूम  (प्रतिनिधी )- कुंथलगिरी (ता. भूम)  "वर्षभरात अनेक सेवानिवृत्ती समारंभ होतात, परंतु शेकडो कर्मचाऱ्यांतून एखादाच असा असतो की जो सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण करतो. शीतल जमगे हे असेच एक उदाहरण आहे. समाजाला आणि संस्थेला निष्ठेने, प्रामाणिकपणे सेवा देणारे असे कर्मचारी तयार व्हायला हवेत," असे गौरवोद्गार वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी व्यक्त केले.

श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय, कुंथलगिरीचे कनिष्ठ लिपिक  शीतल महावीर जमगे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरव व कृतज्ञता समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या  कार्यक्रमाचे आयोजन कुंथलगिरी येथील श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्राच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोठारी उद्योग समूहाचे किरण कोठारी, रवि मसाले उद्योग समूहाचे प्रमुख फुलचंद इंगलवार जैन, श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा सोलापूर संस्थेचे विश्वस्त परागभाई शहा, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रेमचंद देवसाळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.  शीतल जमगे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालय, कोठारी उद्योग समूह आणि सर्व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रेमचंद देवसाळे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी  जमगे यांना त्यांची सेवाभावना आणि निष्ठा याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  अशा सेवाव्रती जीवनातूनच खऱ्या समाजशीलतेचा आदर्श उभा राहतो.

 
Top