धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या 23.66 टीएमसी पाण्यापैकी 7 टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित 16.66 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित 16.66 टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती “मित्र“ चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरित पाण्याबद्दल आकडेवारीसह विस्तृत माहिती दिली. यावेळी पाटबंधारे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता अमोल नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. नितीन भोसले आदी उपस्थित होते.
2022 साली मराठवाड्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या 23.66 टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला फडणवीस यांच्यामुळे 11,726 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यामुळेच 7 टीएमसी पाण्याची कामे सध्या पूर्णत्वाच्या टप्प्यात आली आहेत. मात्र उर्वरित 16.66 टीएमसी पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यासाठीही मुख्यमंत्री सकारात्मक असून मित्रच्या माध्यमातून उर्वरित 16.66 टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शविली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. कृष्णा पाणी तंटा लवाद एकच्या आकडेवारीनुसार कृष्णा खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या हक्काचे 599 टीएमसी पाणी आजघडीला उपलब्ध आहे. त्यापैकी चांगला पाऊसकाळ झाल्यानंतरही केवळ 520 टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्याकडून वापरात आणले जात आहे. 40 टीएमसी पाण्यासाठी आवश्यक कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यामुळे शिल्लक राहिलेल्या 39 टीएमसी पाण्यातून मराठवाड्याचा न्याय हक्क असलेले 16.66 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.