उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका घरात खब-याने दिलेल्या माहिती आधारे गुटख्याची झाडाझडती घेण्याकरीता गेले असता उमरगा पोलीसांना चक्क तेथे एक लाख बेचाळीस हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा आढळून आला. संबंधित मुद्देमाला सह महिलेस जेरबंद करण्याची कारवाई करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले यांनी दिली आहे. आरोपी महिलेस सदर गुन्हयात अटक करून उमरगा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नमुद आरोपीस दि.02 जून 2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पेट्रोलिंग करीत असताना उमरगा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारे एकोंडी रोडवर आले. गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुन्शी प्लॉट येथील महिला नामे कमल गोपीनाथ राठोड ही तिच्या राहत्या घरी गुटखा ठेवुन विक्री करीत आहे. अशी माहिती मिळताच त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना माहिती देवुन त्यांचेकडुन घरझडती वारंट घेवुन दोन शासकीय पंच व पोलीस स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन खात्री केली.
गुटख्याचा शोध घेत असताना सापडला गांजा
सदर घरात गुटखा नसुन घरातील एका खोलीत निळया रंगांच्या कॅरीबॅगमध्ये उग्रवास येत असलेले अंमली पदार्थ गांजाचे पाकीटे ठेवल्याचे व खोलीतुन उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आल्याने छापा मारला असता महिला कमल गोपीनाथ राठोड उर्फ कमल चंद्रकांत मदने उर्फ कमल नामदेव किसवे रा. मुन्शीप्लॉट उमरगा ता. उमरगा हिचे कब्जात 1 लाख 42 हजार 170 रूपये किमतीचे एकुण 09 किलो 430 ग्रॅम वजनाचे गांजा सदृष्य अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदर गांजा सदृष्य अंमली पदार्थ पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केले. सदरची कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उमरगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोहेकॉ शिवलिंग घोळसगांव, पोहेकों. चैतन्य कोनगुलवार, पोना. अनुरूद्र कावळे, पोना. यासीन सय्यद, पोकों. नवनाथ भोरे, पोकों. योगेश बिराजदार, पोकों. राजेश वादे, महिला पोलीस मपोकॉ. स्वाती कौरव, मपोकों. शांता कंदले यांच्या पथकाने केली आहे.