धाराशिव (प्रतिनिधी)-  समृध्द जीवन फुडस इंडियाची एमपीआयडी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलेली मालमत्ता परस्पर विक्री झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचे निवेदन जनसंघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, समृध्द जीवन फुडस इंडिया लि. आणि समृध्द जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. पुणे या महेश मोतेवार याच्या सोसायटीमध्ये ठेवीदारांच्या ठेवी मुदत पुर्तीनंतरही परत न केल्यामुळे 2014 मध्ये पुणे येथील चतू:शृंगी पोलीस स्टेशन पुणे आणि 2015 मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हे दाखल होऊन महेश मोतेवार व त्याचे सर्व संचालक मंडळ यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दि. 02/08/2018 रोजी महाराष्ट्र शासनाने गृह विभागाच्या वतीने ठेवीदारांच्या हितसंबधी अधिनियम कायदा 1999 (एमपीआयडी) नुसार महाराष्ट्रातील समृध्द जीवन फुडस इंडीया लि. व महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लिना मोतेवार यांच्यासह अन्य सर्व संचालक मंडळाच्या नावावर असलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्याच्याच पैकी एक मालमत्ता धाराशिव नगर परिषद हद्दीतील घर नं. 26/138/2 सीटी सर्व्हे नं. 3134 सर्व्हे नं. 236/1 मधील क्षेत्रफळ 1075 चौ. फुट ही मालमत्ता समृध्द फुडस इंडिया लि. तर्फे विनोद पांडुरंग माळी यांच्या नावे होती. आता सदर मालमत्ता कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावे नगर पालिकेच्या दप्तरी नोंद झालेली आहे. ही मालमत्ता परस्पर कोणी हस्तांतरीत केली. याची सखोल चौकशी करून संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. ज्या कारणासाठी सर्व मालमत्ता ताब्यात घेण्यात आली. त्या सर्व ठेवीदारांचे हित जोपासून त्यांच्या ठेवी लवकरात लवकर परत कराव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहुराज माने, राजकन्या जावळे, दिलीप गरड, गणेश शिंदे, श्रीकृष्ण जाधव, कस्तुरबा कारभारी, नवनाथ शेटे, आश्रुबा पौळ, संजिवनी रामगुडे, लता भोसले, इशरत ढाले, निलावती कांबळे, जैबून मिनियार आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top